Header Ads

अज्रस्त्र व अजिंक्य जलदुर्ग | जंजिरा किल्ल्याची संपूर्ण माहिती | Marathi Express

 
 

जंजिरा किल्ल्याची संपूर्ण माहिती : 

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात राजापुरी या गावापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर जंजिरा हा अज्रस्त्र व अजिंक्य जलदुर्ग दिमाखाने उभा आहे. इतिहासाच्या पानात धुंडाळलेल्या माहिती नुसार साधारण सतराव्या शतकात बांधण्यात आलेला जंजिरा किल्ला हा कधीही कुणाला जिंकता आलेला नाही. तो शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा किल्ला ताब्यत घेण्यासाठी तत्कालीन अनेक राज्यकर्त्यांनी अनेकदा जंजिऱ्यावर स्वाऱ्या केल्या परंतु यात कुणालाही यश मिळाले नाही. हे या जंजिरा किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पश्चिम किनार्‍यावर असलेला चहू बाजूने पाण्याने वेढलेला एकमेव अभेद्य व अजय किल्ला म्हणून जंजिऱ्याची ओळख आहे. भक्कम बांधकाम, चहूबाजूने मजबूत तटबंदी व आतमध्ये शेकडो तोफा यामुळे ब्रिटिश, मुगल व मराठे/ मराठी यांनी अनेक प्रयत्न करून देखील जंजिरा किल्ला त्यांना ताब्यात घेता आला नाही. यामुळे या किल्ल्याची इतिहासाच्या पानावर वेगळी नोंद झाली आहे. 

असे पडले जंजिरा नाव :  

जंजिरा हा अरबी आणि कोळी या दोन्ही भाषांच्या संयोगातून तयार झालेला शब्द आहे. अरबी भाषेत जझीरा म्हणजे बेट आणि जल म्हणजे पाणी, पाण्याने वेढलेला जझीरा म्हणजेच जंजिरा असे या किल्ल्याचे नाव पडल्याचे स्थानिक सांगतात.

वैशिष्टय पूर्ण किल्ला  :

त्याकाळी अहमदनगरचा शासक असलेला मलिक अंबर यांच्या देखरेखीखाली जंजिरा किल्ला बांधण्यात आला असल्याची नोंद आहे. एकूण बावीस एकर क्षेत्रफळ असलेला हा किल्ला तयार करण्यासाठी सुमारे २२ वर्ष इतका कालावधी लागला. किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी जागोजागी चौक्या  व १४ बुलंद बुरुज उभारण्यात आलेले आहेत. प्रयेक बुरुजामधील अंतर से ९० ते १०० फूट असून समुद्रापासून सुमारे नव्वद फूट उंचीवर उभारलेला आहे, किल्ल्याच्या चहूबाजूने सुमारे ४० फूट उंच पाण्यात उभारलेली मजबूत तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत जवळपास ५०० हून अधिक सिद्धी घराण्यांच्या तोफा आढळतात. किल्ल्यात एक गोड्या पाण्याचे तलाव आहे.  चहूबाजूने खारे पाणी आणि आत मध्ये गोड्यापाण्याचा  तलाव हे एक वैशिष्ट्य जंजिरा किल्ल्याचे सांगता येते.

जंजिरा किल्ल्याचा इतिहास :

जंजिरा किल्ल्याचा इतिहास अतिशय रोचक आहे. पूर्वीच्या काळी या बेटावर कोळी लोकांची वस्ती होती. समुद्र लुटारू ,चाचे याचा नेहमी त्रास होत असे. म्हणून राम पाटील या व्यक्तीने या लुटारू पासून संरक्षण मिळवण्यासाठी मेढेकोट किल्ल्याचे बांधकाम केले.( मेढेकोट किल्ला म्हणजे लाकडी ओढक्यांनी तयार करण्यात आलेला किल्ला ) त्याकाळी हा परिसर निजामाच्या अखत्यारीत  असल्याने येथे कुठलेही बांधकाम करण्यासाठी निजामाच्या ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत असे. म्हणून राम पाटलांनी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घेऊन हा मेढेकोट किल्ला उभारला, या किल्ल्याच्या उभारणीमुळे समुद्रातून येणाऱ्या चाचे आणि लुटारूंपासून कोळी वस्तीचे सरंक्षण झाले. परंतु राम पाटील हा शिरजोर झाला. राम पाटलांनी या मेधकोट किल्ल्याच्या सरंक्षणासाठी मनुष्यबळ एकत्र करून शिफबंदी  उभारली. यामुळे राम पाटलाची ताकद वाढली. नंतर नंतर राम पाटील निजामाच्या ठाणेदाराला सुद्धा जुमानत नसे.

शूर रामभाऊ कोळी (राम पाटील)

काही इतिहास तज्ञांच्या मते या बेटावर मूळ कोळी लोकांचे वास्तव्य असल्याने जंजिरा हा किल्ला पूर्वीपासून कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित येथील कोळी शासक हेच प्रथम जंजिऱ्याचे जनक असतील असावेत. यादवांचे शासन संपून सुलतानी राज्य आल्या नंतर सुद्धा इ.स १४९० पर्यंत हा किल्ला स्वतंत्रच होता. नंतर  १४८५ मध्ये मलिक अहमद ने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी.(राम पाटील) यांच्या पराक्रमापुढे अहमद मलिकने हात टेकले होते. राम पाटील (रामभाऊ कोळी ) हा खूप पराक्रमी व शूर होता. राम  पाटलांकडून हा किल्ला सहज मिळविणे शक्य नाही हे  निजामाच्या चांगले लक्षात आले होते. यासाठी काहीतरी युक्ती लढविणे गरजेचे होते म्हणून हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी निजामाने पिरमलखानची नेमणूक केली. पिरमलखानने अतिशय धूर्तपणे आणि विश्वास घाताने किल्ल्यात प्रवेश मिळून किल्ला ताब्यात मिळविला 

रामभाऊ कोळी (राम पाटील ) वर्चस्व खटकले  :

राम पाटलांचे वाढते वर्चस्व निजामाला खटकले म्हणून राम पाटलाचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाने पिरमानखानला नेमले. पिरमानखान अतिशय मुत्सद्दी व चलाख होता.पिरमानखानने राम पाटलांविषयी माहिती जमवली. राम पाटील हा सहज किल्ल्यावर येवू देणार नसल्याचे पिरमानखानच्या लक्षात आले म्हणून  पिरमानखाने रामपाटीलांचा बंदोबस्त करण्याची योजना आखली. पिरमानखानने दारूच्या व्यापाराचे सोंग आणले व राम पाटलासोबत हळू हळू जवळीक वाढविली. एके दिवशी पिरमानखानने राम पाटलाकडे मेढकोट किल्ला  बघण्याची इच्छा व्यक्त केली. आणि गाफील राम पाटलांनी पिरमानखानला किल्ला बघण्याचे निमंत्रण देऊन टाकले.  या भेटी दरम्यान पिरमानखानने राम पाटलाला दारूचा नजराना भेट दिला. अशा पद्धतीने पिरमानखानने चाणाक्षपणे किल्ल्यामध्ये प्रवेश मिळविला. किल्ल्यामध्ये राम पाटलाने उभारलेली कोळ्यांची मोठी शिफबंदी होती. पिरमानखानने अतिशय चलाखीने कोळ्यांच्या शिफबंदीला येथोच्च दारू पाजून नशेत झिगवले. किल्यातील शिफबंदी पूर्णपणे झिंगल्यावर नियोजनपूर्वक बुधल्यात लपून बसलेले निजामाचे सैन्य बाहेर आले आणि त्यांनी रात्री झिंगलेल्या कोळ्यांना कापून काढले आणि किल्ला ताब्यात घेतला. ही घटना घडली सुमारे इ.स १५११ च्या दरम्यान. असा हा किल्याचा थोडक्यात इतिहास आहे.

गोड्या पाण्याचा तळव जंजिरा :
बुऱ्हाणखानने केले दगडी बांधकाम :

पिरमानखानच्या मृत्यूनंतर बुऱ्हाणखान नेमणूक करण्यात आली. या बुऱ्हाणखान या बेटावर असलेला मेढेकोट किल्ला पाडून येथे दगडी भक्कम किल्ल्याचे बांधकाम केले. बुऱ्हाणखान याने किल्ल्याचे बांधकाम करतांना  मुख्य दरवाजावर एक सुंदर शिल्प बसवले. वाघाच्या चारीही पंजा मध्ये चार हत्ती, शेपटी मध्ये एक हत्ती आणि तोंडात एक हत्ती पकडलेले असे हे शिल्प आहे. हा किल्ला किती शक्तिशाली आहे याचीच जाणीव हे शिल्प करून देते. शिवाय इतर सत्ताधीशांना हे शिल्प संदेश देतो की, मी पश्चिम किनाऱ्यावरील शेर आहे. तुम्ही जरी हत्ती प्रमाणे मोठे  ताकतवान असले तरी तुमची पण या हातींसारखी हलत करू शकतो.  म्हणून या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका.बुऱ्हाणखान नंतर अलगारखान, आणि त्यानंतर इब्राहीमखान यांची नेमणूक झाली.

साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त काळ सिद्दी घराण्याचा ताबा :

इ.स १६१७ मध्ये जिंजिरा या किल्ल्यावर निजामशहा कडून सिद्दी अंबर यांची नेमणूक करण्यात आली.आणि किल्ल्याचे जंजिरे मेहरूब’ असेकरण्यात आले. सिद्दी अंबर हा सिद्दी घराण्याचा मूळ पुरुष मानल्या गेला. नंतर सिद्धी सुलतान, याकूब खान, युसूफ खान, फत्तेह खान  असे वीस नामवंत आणि धूर्त सिद्दी सत्तधिश यांनी जंजिरेचा कारभार सांभाळला आहे .इ.स १५११ पासून १९४७ पर्यंत असे  साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक कालवधी नाना खटपटी करून सिद्दी घराण्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. शेवटचा सिद्दी मुहमंदखान यांनी राज्याच्या स्थापनेनंतर ३ एप्रिल १९४८ रोजी  भारतीय संघराज्यात विलीन केले.

अजय जंजिरा किल्ला :

मराठा बरोबर सुद्धा अकरा वेळा झटापटी झाल्याची नोंद आहे. तरीसुद्धा मराठ्यांना जंजिरा वरती ताबा मिळवता आला नाही हे विशेष.  महाराष्ट्राच्या गडकिल्ले आणि जलदुर्गाच्या इतिहासामध्ये मराठ्यांना ज्या किल्ल्यावरती ताबा मिळवता आला नाही तो एकमेव जंजिरा किल्ला म्हणून नोंद आहे.संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला हस्तगत करण्यासाठी काही हालचाली केल्याचे संदर्भ मिळतात या जंजिरा हस्तगत करण्याच्या उद्देशाने जंजिरा किल्ल्याजवळ किल्ल्यानजीक साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग किल्ला उभारला होता.परंतु तरीही जंजिरा ताब्यात घेणे शक्य  झाले नाही. जंजिऱ्याचे भौगोलिक स्थान, मजबूत तटबंदी,बुरूजे,निरीक्षण चौक्या , चहू बाजूंनी समुद्र, किल्ल्यावरील पाचशेहुन अधिक तोफा, गोड्यापाण्याचे तलाव, विस्तीर्ण  क्षेत्रफळ या वैशिष्ट्यामुळे किल्ला इतका दीर्घकाळ अजिंक्य राहण्याचे कारण लक्षात येते. किल्यावरील  कलाल बांगडी ही सर्वात मोठी तोफ पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

छत्रपती शिवाजी महाराज व जंजिरा  :

छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स १६५७ मध्ये रघुनाथ सबनीस यांच्याकडे जंजिऱ्याची मोहीम दिली परंतु त्या मोहिमेला यश आले नाही. यांनतर इ. स १६६९ ला पुन्हा मोहीम हाती घेतली. यावेळी पायदळ सैन्याने दंडा व  राजपुरी वर चढाई करायची आणि नौदलाने जंजिऱ्यावर स्वारी करून जंजिऱ्याची कोंडी करायची असा बेत आखण्यात आला होता. त्यावेळी जंजिऱ्याचा सिद्दी फत्तेखान सोबत संबूल, कासीम आणि खैर्यत सैनिक  होते. त्यावेळी फत्तेखान हा दंडा-राजपुरीत आणि त्याच्या अखत्यारीत  इतर सात किल्ले होते. जंजिऱ्यावर स्वारी करण्यासाठी महाराजांचे आरमार जंजिऱ्याला उभे राहिले. पूर्ण ताकदीनिशी जंजिरासाठी बळ खर्ची करण्यात येत होते.  दुसरीकडे. पायदळाने फत्तेखानाचे सातही किल्ले काबीज केले आणि दंडा व राजपुरी कडे वळाले तेव्हा फतेहखान घाबरला. मराठी आरमारापुढे जंजिऱ्याची शान समजली जाणारी कलाल बांगडी तोफ थंड पडली. मराठी पायदळाने दंडा-राजपुरी काबीज केला आणि जंजिऱ्याची सर्व बाजूंनी कोंडी झाली. जंजिरा फत्तेखानच्या ताब्यातून निसटला जवळपास निश्चित झाले. घाबरलेल्या  फत्तेखानाने मुंबईच्या इंग्रजांना मदतीसाठी हात जोडले, परंतु सुरत  येथे असलेले  वरिष्ठ इंग्रजांना महाराजांच्या ताकदीची कल्पना होती. म्हणून त्यांनी महाराजां विरुद्ध पाऊल न उचलण्याचा व  तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबईच्या इंग्रजांना दिला. हा डाव फसल्यानंतर मग फत्तेखानने मोगलांकडे विनंती केली मोगलांनी महाराजांना वेढा उठवण्याची बद्दल कळविण्यात आले. पुरंदरचा वेढा व तह, महाराजांची आग्रा भेट व तिथले पलायन या दरम्यानचा तो कालावधी होता. महाराजांनी मोगलांच्या निरोपला दुर्लक्षीत केले.आणि जंजिऱ्याचा वेढा अजूनच बळकट केला. फत्तेखानाची अजूनच कोंडी झाली.

महाराजांनी फत्तेखानला कळविले की, जंजिरा आमच्या स्वाधीन करा त्या बदल्यात आम्हीतुम्हाला भरपाई म्हणून मोठी रक्कम देऊ व स्वराज्यात योग्य असा मान देखील देऊ.हतबल झालेला फत्तेहखान त्यास कबूल झाला परंतु इतर सैनिक फत्तेखानच्या विरोधात गेले.फत्तेखान फितूर झाला असे म्हणत फत्तेखानाला तुरुंगात टाकले व जंजिरा ताब्यात घेतला. नंतर सिद्दी संबूल हा जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी झाला तसेच सिद्दी कासिम, सिद्दी खैर्यत हे जंजिऱ्याचे किल्लेदार व हवालदार करण्यात आले.

अतिशय भक्कम बांधकाम तसेच किल्ल्याच्या चहूबाजूने समुद्र वेढलेला असल्याने जंजिरा किल्ला कायम अभेद्य आणि अजय राहिला आहे. या किल्ल्यामध्ये असलेली कमाल बांगडी तोफ ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तोफ व संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय मजबूत हा किल्ला असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हा किल्ला शेवटपर्यंत स्वराज्यात दाखल होऊ शकला नाही किंवा अजेय राहिला असे आपल्याला म्हणता येईल. नंतरच्या काळात सिद्धी सरदारांनी सुद्धा हा किल्ला अजिंक्य ठेवण्यास यश मिळविले. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा हा किल्ला हस्तगत करण्यासाठी आणि स्वराज्यात आणण्यासाठी किल्ल्याजवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्गाची उभारणी केली परंतु तरीही मुरूड-जंजिरा हा किल्ला स्वराज्यात येऊ शकला नाही म्हणून स्वराज्याचे शल्य असेही या किल्ल्यास म्हंटले जाते.

हा किल्ला अजिंक्य राहण्याचे मुख्य कारण म्हणजे या किल्याची भक्कम बांधणी आणि चहुबाजूने असलेला समुद्र. असा हा अभेद्य आणि अजिंक्य असलेला किल्ला आजही ही मोठ्या दिमाखाने समुद्रामध्ये हे उभा आहे. दररोज हजारो पर्यटक, इतिहास प्रेमी मुरूड-जंजिरा किल्ल्याला भेट देत असतात. महाराष्ट्रातील मोजक्या काही किल्ल्यांमध्ये या मुरुड जंजिरा किल्ल्याचा समावेश होतो.जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीवरुन नजर टाकली असता एक भलामोठा विस्तृत प्रदेश दिसतो. येथूनच आपल्याला समुद्रात बांधलेला पद्मदुर्ग आणि किनाऱ्यावरील सामराजगड ठळक नजरेस पडतात. जवळपास साडेतीनशे वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला इतिहासातील अनेक पुराव्याचा साक्षीदार झालेला आहेत. जंजिरा किल्ल्याला भेट देताना या किल्ल्याविषयीचा थोडा अभ्यास आणि इतिहास जाणून घेतल्यास या किल्ल्याची भेट निश्चित स्मरणीय ठरेल.

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे :

पारशी लेख : प्रवेशद्वारावरील पांढ-या दगडातील पारशी लेख आहे.
दगडात कोरलेले शिल्प : दरवाजाच्या दोन्हीच्या भिंतीवर विशिष्ट प्रकाराचे दगडात कोरलेले शिल्प आहे. हे शिल्प  गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते.
नगरखाना : जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारा जवळ नगरखाना आहे.
कलाल बांगडी तोफ : किल्ल्याच्या वर तटावर तोफा ठेवलेल्या आहेत.त्यातील सर्वात मोठ्या तोफेचे नाव कलाल बांगडी असे आहे ही तोफ त्याकाळी खूप प्रसिद्धी होती.  किल्ल्यामध्ये पाच पीर आहेत.
सुरूलखानाचा वाडा: किल्ल्यात बाहेर पडल्यानंतर समोर तीन मजली जीर्ण इमारत नजरेस पडते. हि इमारत  सुरूलखानाचा वाडा म्हणून ओळखल्या जाते.
गोड्या पाण्याचे तलाव : सुरुलखानच्या वाड्याच्या समोर सुंदर बांधकाम केलेले एक षटकोनी आकाराचे  गोड्या पाण्याचे तलाव आहे
पश्चिम दरवाजा (दर्या) :  गडाच्या पश्चिम दिशेला बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा आहे. या दरवाजाला दर्या दरवाजा असे म्हणतात. या दरवाजाचे तोंड हे दर्याच्या म्हणजे सागराच्या दिशेने असल्याने संकटकाळी बाहेर पडण्यासाठी हा दरवाजा वापर करण्यात येई. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.